मुंबई : राष्ट्रीय युवा महोत्सव यंदा नाशिक येथे दि १२ ते १६ जानेवारी २०२४ या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यानुषंगाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक आयोजित करून घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शासनाला मिळाली आहे. त्यामुळे नाशिक येथे दिनांक १२ ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ होणार आहे. त्यामध्ये देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांच्यातील युवांचे चमू सहभागी होणार आहेत. त्यामुळे महोत्सवाचे आयोजन यशस्वी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित होते. या बैठकीस नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी होते.