कर्नाटकमध्ये जलसिंचनासाठी साडेतीन हजार कोटी देताना इतर राज्यात खास करून महाराष्ट्राला तसा निधी का दिला जात नाही? – जयंत पाटील
आगामी निवडणुकांकडे लक्ष ठेवून आपली घसरलेली लोकप्रियता पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाद्वारे केला आहे. एका सर्वेक्षणाप्रमाणे देशाच्या जनतेचे मत सत्तारूढ पक्षासोबत होते ते आजच्या अर्थसंकल्पानंतर विरोधात गेले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, देशातील कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला असताना कोरोनानंतर परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. डिसेंबर महिन्यात बेरोजगारीचा दर ८.३ टक्क्यांवर गेला. २०२४ च्या निवडणुका होण्यापूर्वीचा मोदी सरकारकडून हा शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये नव्या घोषणांपेक्षा जनतेचे लक्ष देशात राबवल्या जाणाऱ्या आधीच्या योजनांच्या प्रगतीकडे लागले होते. मात्र सत्तारूढ पक्षाला ते करण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निवडणुकांना संबोधून केलेला आहे, याव्यतिरीक्त दुसरा विचार करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया जयवंत पाटील यांनी दिली.