वर्धा जिल्ह्यातील दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिलेल्या थ्री टेस्ला आणि एमआरआय सुविधेचा उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत मांडले.
दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून रूग्णसेवेचे मोठे ईश्वरीय कार्य करण्यात येत आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांचे रुग्णसेवेचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या सहवासाने पावन झालेल्या भूमीत त्यांनी रुग्णसेवेचे मोठे कार्य उभे केले आहे त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी मनापासून कौतुक केले.
त्यांनी सुरू केलेल्या रुग्णसेवेचा हा वसा त्यांची दोन्ही मुले पुढे समर्थपणे चालवीत आहेत असेही यावेळी नमूद केले. आज सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय सेवेचा विदर्भातील जनतेला मोठा लाभ मिळणार आहे. याठिकाणी रुग्णालयाबरोबरच शिक्षणाचेही कार्य सुरू आहे. कोरोना काळातही या संस्थेच्या रुग्णालयांनी अतिशय कौतुकास्पद काम केले होते असेही यासमयी बोलताना सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांना घराच्या जवळ मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबई आणि ठाणे भागात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. लवकरच हा संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येईल असे याप्रसंगी बोलताना जाहीर केले.
यासमयी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार समीर मेघे, आमदार पंकज भोयर, सागर मेघे तसेच संस्थेत काम करणारे सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.