राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती
मुंबई : मुंबईतील विधानभवनात विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष आज राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तसेच विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठकही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, पावसाळी अधिवेशन २७ जून ते शुक्रवार १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार असून, शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील. या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला.
या वेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार आशिष शेलार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अमीन पटेल तसेच विधान परिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.