माझ्या मातृभूमीमध्ये झालेला माझा हा सन्मान माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान : राजा माने

27

बार्शी :  पत्रकारितेच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यकर्तुत्वाची ओळख निर्माण करणारे सर्व समावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे राजा माने होय. बार्शी सारख्या ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील गिरणी कामगाराचा मुलगा ते महाराष्ट्र राज्याचा राजकीय विश्लेषक म्हणून तर जिल्हा प्रतिनिधी पदा पासून महाराष्ट्रातील अवल दर्जाच्या दैनिकाच्या संपादकापर्यंत तसेच, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून एका पोर्टल पासून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांपर्यंत ज्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण करून महाराष्ट्रातील पत्रकारितेमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला, असे पत्रकारितेतील महागुरू राजा माने यांचा 61 वा अभिष्टचिंतन सोहळा, भाग्यकांता ग्रुप व राजा माने मित्र परिवाराच्या वतीने बार्शी येथील आर. के. क्लब मध्ये मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

सन्मान सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली तर अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त केक कापतेवेळी सूर्यकांत वायकर दादांच्या सुमधुर गाण्याने सोहळ्याची रंगत आणखीनच वाढली. याचवेळी बार्शीचे सुपुत्र, राष्ट्रपती पदक विजेते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांचा देखील सहकुटुंब सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी धाराशिव मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, बार्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजाभाऊ राऊत, माजी मंत्री दिलीपराव सोपल, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, माजी नगराध्यक्ष रमेशआण्णा पाटील, माजी नगराध्यक्ष ऍड असिफभाई तांबोळी, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोषकाका ठोंबरे यांच्या समवेत बार्शी शहर आणि तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, प्रशासकीय, वैद्यकीय, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतीक, सामाजिक, औद्योगिक, कृषी, व्यवसाय, बँकिंग अशा विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर तसेच दैनिक, साप्ताहिक व डिजिटल मीडियाचे पत्रकार, नातेवाईक, माने कुटुंबीय व राजा माने यांच्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

याप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत व माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आपल्या अभिष्टचिंतन मनोगतातून राजा माने यांनी पत्रकारीता क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याचे कौतुक करत, त्यांचे कार्य येणाऱ्या पिढीसाठी आदर्शवत आणि राज्याला दिशा देणारे ठरेल असेही व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी राजा माने यांना 61 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत अराजकीय व्यासपीठ असल्यामुळे मनमोकळेपणाने विनोदात्मक फटकेबाजी करत हास्यांचे फवारे उडविले.

सत्काराला उत्तर देताना राजा माने यांनी म्हटले की, बार्शी सारख्या ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मी मुलगा असून, माझ्यावर असलेले आक्का आणि बापूंचे संस्कार, माझ्या मित्र परिवाराचे अनमोल सहकार्य, माझ्या कुटुंबाची साथ, माझ्याकडे असलेला प्रामाणिकपणा, जिद्द आणि सातत्य यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील प्रवासामध्ये अनेक व्यक्तिमत्त्वांनी मला कळत नकळतपणे सहकार्य केलं, अनेकांनी जीवापाड प्रेम केलं त्याची उतराई मी कधीही करू शकत नाही. माझ्या मातृभूमीमध्ये झालेला माझा हा सन्मान माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असून, तो कायमस्वरूपी अविस्मरणीय राहील. येणाऱ्या काळात देखील याच उमेदीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्यासाठी एक प्रेरणादायी कार्य करत राहील असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजिनीयर अमित इंगोले यांनी केले, सूत्रसंचालन नीता देव यांनी केले तर उपस्थितांचे आभार भाग्यकांता ग्रुपचे मुरलीधर चव्हाण व रोहन नलावडे यांनी मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.