शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली, ‘या’ ठिकाणी होणार

मुंबई: कोरोना संकटामुळे  गतवर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. अगदी मोजके महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. परंतु आता कोरोनाचं संकट ओसरु लागलं आहे. त्यामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा नियम आणि संकेत पाळून साजरा करण्यात येणार आहे. दसऱ्याला पार पडणाऱ्या मेळाव्याची जागा अखेर ठरली आहे.

माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी बंदिस्त हॉलमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात अर्थातच प्रमुख वक्ते असणार आहेत ते मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यावेळी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विरोधकांना दरवर्षीच्या दसरा मेळाव्यात टार्गेट केलं जातं. आता भाजप हा एकमेव विरोधी पक्ष शिवसेनेला आहे कारण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हात मिळवणी करत महाविकास आघाडी सरकार आणलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा गेल्यावर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कसमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता. तसेच, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईनने शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं होतं. मात्र, यंदाच्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने मेळावा होणार नसून, प्रत्यक्ष मेळावा घेणार अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती.

षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा पार पडणार असून, 50 टक्के उपस्थितीत दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेतले काही काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यात कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसल्याने शिवाजी पार्क ऐवजी शिवसेनेने यंदाही दसरा मेळावा हॉलमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!