काँग्रेसकडून राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर
मुंबई: दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या जागेसाठी भाजपकडून या जागेसाठी औरंगाबाद भाजपा अध्यक्ष संजय किणेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत, असं देखील पाटील यावेळी म्हणाले.
काँग्रेस नेते राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.
Hon'ble Congress President Smt. Sonia Gandhi has approved the proposal for the candidature of Dr (Smt) Pradnya Rajeev Satav as Congress candidate to contest the bye-election to the Legislative council of Maharashtra to be elected by the MLAs. pic.twitter.com/AYR2r8NUqW
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 15, 2021
राज्यात विधानपरिषदेच्या माध्यमातून सातव कुटुंबाला भविष्यातल्या राजकारणासाठी ताकद दिली जाते का याचीही उत्सुकता होती. शेवटी प्रज्ञा सातव यांनाच संधी दिली गेली आहे. या एका जागेची निवड आमदारांमधून होणार असल्यानं आणि महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यानं काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. शरद रणपिसे यांच्या निधनानंतरची उर्वरित चार वर्षांची टर्म म्हणजे 27 जुलै 2024 पर्यंतची टर्म नव्यानं निवडून आलेल्या आमदारास मिळणार आहे.