अठरापगड जातींना आणि बारा बलुतेदारांना न्याय देणारा अर्थसंकल्प – चंद्रशेखर बावनकुळे

छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभारापासून प्रेरणा घेत अठरापगड जातींना आणि बारा बलुतेदारांना न्याय देणारा राज्याचा उत्कृष्ट अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडला. एकविसाव्या शतकातील महाराष्ट्र कोणत्या दिशेने जावा हे स्पष्ट करणारा आणि राज्याला नवी उभारी देणारा हा अर्थसंकल्प आहे. त्याबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, या अर्थसंकल्पाने राज्याचा इतिहास, संस्कृती आणि विरासत जपतानाच संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेऊन समाजाच्या सर्व घटकांना मदत केली आहे. संपूर्ण राज्यातून या अर्थसंकल्पाचे स्वागत होत आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे. महिलांसाठी महत्त्वाच्या योजना आहेत. संजय गांधी आणि श्रावण बाळ या योजनांमधून मिळणाऱ्या रकमेत वाढ करून वंचित वर्गाला मदत केली आहे. त्याचबरोबर राज्याचा जीडीपी वाढवून आपले राज्य देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य होण्यासाठी अर्थसंकल्पात उपाययोजना केली आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे आपण या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो.

त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पासाठी जनतेच्या सूचना मागविल्या होत्या व त्यांच्या आवाहनाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आणि चाळीस हजार सूचना आल्या. या सूचनांचा संवेदनशीलतेने विचार करून त्यातील काहींचा अर्थसंकल्पात समावेश केला. अर्थसंकल्पात जनभागिदारीचा हा अनोखा उपक्रम स्वागतार्ह आहे. यामुळे हा अर्थसंकल्प सामान्य जनतेचा होण्यास मदत झाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!