राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत असताना काल अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केवळ घोषणांचा सुकाळ करून जनतेला मोठी स्वप्ने दाखवण्याचे काम झाले – अनिल देशमुख

राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत असताना काल अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केवळ घोषणांचा सुकाळ करून जनतेला मोठी स्वप्ने दाखवण्याचे काम झाले. त्यामुळे २९३ अन्वये प्रस्ताव मांडत राज्यातील शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी आ. अनिल देशमुख यांनी केली.

संत्री आणि मोसंबीच्या पीकांचे विदर्भात मोठे नुकसान झाले आहे. विदर्भात सकाळी ऊन व रात्री थंड हवामान असल्याने संत्री व मोसंबी फळांची मोठी गळती होत आहे. नागपूर जिल्ह्यात वादळाचे संकटही आल्याने या सर्व गोष्टींचे पंचनामे करणार असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. हे पंचनामे लवकरात लवकर करावे, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.
त्याशिवाय सहा महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे विदर्भात झालेल्या पीकांच्या नुकसानाची भरपाई अजूनही प्रलंबित आहे. पंचनामे करूनही ही नुकसान भरपाई मिळालेली नाही. तीदेखील लवकर मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यासोबतच कापूस उत्पादक शेतकरीही अडचणीत आहेत. कापसाचे भाव आठ हजाराच्या खाली आले आहेत. कापसाचे आयात शुल्क कमी करण्यात आले, तसेच कापूस निर्यात मोठ्या प्रमाणावर होण्याची गरज असताना ही निर्यात कमी झाल्याने याचा परिणाम कापसाच्या दरावर झाला आहे. कापसाच्या आयात-निर्यात धोरणावर योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा. तसेच राज्य शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्याला राज्याच्या तिजोरीतून काही मदतीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कांद्याचा प्रश्नही ऐरणीवर आहे. नाफेडमार्फत कोणतीही कांदा खरेदी सुरु नसतानाही शेतकऱ्यांच्या खोट्या नावांनी कांदा खरेदीची बीले काढण्याचा प्रकार व्यापाऱ्यांकडून होत आहे. यात शासनाने लक्ष घालून अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!