अनिल देशमुखांच्या अडचणी वाढत्याच; आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई: आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपां प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी संपता संपत नाहीत. कारण अनिल देशमुख यांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच सचिन वाझेलाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली गेली होती. त्यानंतर त्यांची कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले होते. आता पुन्हा एकदा त्यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.

काय आहे प्रकरण?

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी 100 कोटींची खंडणी दर महिन्याला मुंबईतील बार आणि रेस्तराँमधून गोळा करण्यास सांगितलं होतं असा आरोप केला आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली.

अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. दरम्यान परमबीर सिंग यांनी एक प्रतिज्ञापत्र काही दिवसांपूर्वी न्यायालयात सादर केलं. त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात आपल्याकडे पुरावे नसल्याचं म्हटलं आहे.