सिडको प्राधिकरण आणि पनवेल महानगरपालिका यांच्यात सामंजस्य करार… पायाभूत सुविधांचे सिडकोकडून महानगरपालिकेला हस्तांतरण

सेवाशुल्क आकारणी व अन्य पायाभूत सुविधांचे हस्तांतरण करण्याबाबतच्या सिडको प्राधिकरण आणि पनवेल महानगरपालिका यांच्यातील सामंजस्य करारावर शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कराराद्वारे सेवाशुल्काची आकारणी आणि अन्य पायाभूत सुविधांचे सिडकोकडून महानगरपालिकेला हस्तांतरण करण्यात आले आहे.
यात प्रामुख्याने रस्ते, पदपथ, पावसाळी गटारे, पथदिवे, विद्युत सेवा, मलनिस्सारण वाहिन्या, मलनिस्सारण पंप हाऊस, होल्डिंग पॉन्ड्स, अग्निशमन केंद्र, दफनभूमी, स्मशानभूमी, समाज मंदिरे, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी लागणारे भूखंड, महापौर, आयुक्त, पनवेल महानगरपालिका कार्यालयासाठीचे भूखंड, दैनिक बाजारपेठेचे भूखंड तसेच अन्य वारपासाठी असलेल्या भूखंडांचा समावेश असेल.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.