बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली..  हिंदुत्वाला डाग लावण्याचे काम केले..  सत्तेसाठी भूमिका बदलली , एकनाथ शिंदेंचे ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र 

26

रत्नागिरी : माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. उद्धव ठाकरे यांनी ५ मार्च रोजी खेडमधील गोळीबार मैदानावर सभा घेतली त्याच मैदानावर शिंदे यांची हि सभा पार पडली. या सभेत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. दरवाजे उघडेच ठेवा , सर्व बाहेर जाणार आहेत, तुम्ही दोघेच उरणार आहात , कारण तुम्ही शिवसेना कार्यकर्त्यांना मोठं होऊ दिले नाही , त्यांना संधी नाकारली , असे म्हणत शिंदे यांनी जोरदार टीका केली.

एकनाथ शिंदे म्हणाले कि, याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक आपटी बार येऊन गेला. पण मी त्यांना उत्तर द्यायला आलेलो नाही. गेले काही महिने त्यांचा एकच उद्योग चालू आहे. जागा बदलते , पण मुद्दे तेच असतात. त्यांचे शो राज्यभर चालू राहणार आहेत. खोके आणि गद्दार याशिवाय तिसरा शब्द त्यांच्या भाषणात नसतो.  त्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. पक्ष त्यांनी सत्तेसाठी गहाण ठेवला. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली. हिंदुत्वाला डाग लावण्याचे काम केले. सत्तेसाठी भूमिका बदलली. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि धनुष्यबाण घेऊन पुढे चाललेलो आहोत, असे शिंदे यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले कि, गद्दारी २०१९ साली झाली. राहुल गांधी आणि इतरांच्या बरोबर सत्तेसाठी गद्दारी केली गेली. हा एकनाथ शिंदे गद्दार नाही,  वफादार आहे. यांनी नेहमीच कार्यकर्त्यांना लहान करण्याचं काम केले. कार्यकर्त्यांना संधी दिली नाही. पण यांना कल्पना नाही कि एक काळ असा येईल कि जेव्हा त्यांच्याबरोबर कोणी राहणार नाही फक्त हम दो आणि हमारे दो एवढेच राहतील , असा टोला शिंदे  यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात काँग्रेस – राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाचा बल्ब पेटवला आणि  सगळंच बदललं. अशोक चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्हीच म्हणाला होतात कि त्यांनी शेंण खाल्लं आता त्यांच्याच पंक्तीत बसून तुम्ही काय खाताय ? , असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.