माझी लाडकी बहीण या योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची आता वाळू सरकली – आमदार भरतशेठ गोगावले
महाड : महाड विधानसभेचे शिवसेनेचे आमदार, विधिमंडळ पक्ष प्रतोद,उपनेते भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते आज बिरवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला वंदन करून उपस्थितांना स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत निगडे ग्रामपंचायतच्या वतीने निगडे येथील शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले तसेच तेथे दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
माझी लाडकी बहीण या योजनेबाबत माहिती देताना भरतशेठ म्हणाले कि, विरोधकांच्या पायाखालची आता वाळू सरकली आहे. विरोधक म्हणाले कि पैसे मिळणार नाहीत, परंतु काल पासून बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. १७ तारखेपर्यंत सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. एक वर्षाची पूर्ण तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे. आम्ही लाडक्या बहिणीचं संगोपन करतोय असे गोगावले यावेळी म्हणाले. कितीही चांगली काम केली तरी विरोधक हे बोलतच राहतात, मात्र आम्ही आमचं काम करत राहू, असे गोगावले म्हणाले. महाड तालुक्यामध्ये तीन तालुक्यात मिळून आता पर्यंत ४२ हजार ३९० महिलांचे अर्ज या योजनेसाठी मंजूर करण्यात आले असून, महिलांच्या खात्यामध्ये शासनाद्वारे ३ हजार रुपये जमा होण्यास सुरवात झाली आहे.
आमदार गोगावले यावेळी म्हणाले कि, आज आपला देश प्रगतीपथावर चाललेला आहे. महाराष्ट्रही प्रगतीपथावर आहे. यानिमित्ताने घरोघरी तिरंगा हि जी काही संकल्पना आहे, ती लोकांनी राबवावी. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाला येता येत नाही, तरी किमान आपल्या घरी तरी तिरंगा फडकावून त्याला सलामी द्यावी अशी इच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली.