सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालून चुकीचे पायंडे पाडू नका – अजित पवार

विधिमंडळाच्या सभागृहाचे कामकाज प्रथा, परंपरा व नियमांना धरुन चालावे यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार कायम आग्रही असतात. आज राज्याचे एक मंत्री बैठकीत व्यस्त असल्याने प्रश्न राखून ठेवण्याची वेळ विधानसभेच्या सभागृहात आल्यावर अजितदादा चांगलेच संतप्त झाले. विधिमंडळ सुरु असताना विधिमंडळाच्या कामकाजालाच मंत्र्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, चुकीचे पायंडे पाडून सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालू नका, असे खडेबोल अजितदादांनी सरकारला सुनावले.

राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे विधानसभेत आज प्रश्न क्रमांक दोन राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली. या गोष्टी सभागृहात वारंवार घडत आहेत. सभागृहाच्या प्रथा, परंपरा पायदळी तुडविण्याचे काम सुरु आहे. मंत्र्यांच्या अनुपस्थितीने प्रश्न राखून ठेवण्याचे समर्थन करता येणार नाही. विधिमंडळाच्या इतिहासात मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न राखून ठेवल्याचे यापूर्वी एकही उदाहरण नाही. त्यामुळे विधिमंडळ सुरु असताना विधिमंडळाच्या कामकाजालाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, अशी स्पष्टोक्ती अजितदादांनी केली.

प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, ग्रामीण पाणी पुरवठा योजना यासारख्या सार्वजनिक बाबी सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या जीवनात महत्त्वाच्या असतात. त्यामुळे थकीत वीज बिलांसाठी अशा सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये. वीज बिलांसाठी या सार्वजनिक बाबींचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकार वारंवार घडतात, त्यामुळे राज्य सरकारने याविषयी तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षेनेते अजितदादा पवार यांनी केली.