मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबत तयार केलेला अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
दोन दिवसांपूर्वीच रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने मराठी भाषा विद्यापीठ स्थापने बाबतचा अहवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर केला होता. मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून होती. या मागणीचे महत्व लक्षात घेऊन शासनाने समितीचे गठन केले होते. समितीने दोन महिन्यांत आपला अहवाल पूर्ण केला आहे. आज तो अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. विद्यापीठाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होईल, असे पाटील यांचे म्हणणे आहे.
याप्रसंगी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री ,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,समितीचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, व समितीचे सदस्य उपस्थित होते.