महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे अतुट नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे देशातील अन्य राज्यांसोबत नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत, त्यातही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते अतुट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत शरयू नदीच्या तीरी केले. मुख्यमंत्री  शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी शरयू नदीवरील विशेष महाआरती करण्यात आली.

मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज अयोध्या येथे शरयू नदीच्या किनारी झालेल्या महाआरतीत ते सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्याचे नाते खूप जुने आणि अतुट असे आहे. उत्तर प्रदेशकडे संपूर्ण देश हा आस्थेने आणि श्रद्धेने पाहत आहे. महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांचे खुल्या मनाने उत्तर प्रदेश वासियांनी उत्साहात स्वागत केल्याच्या भावना त्यांनी यावेळी बोलून दाखविल्या. मुख्यमंत्री होण्यापूर्वी अनेक वेळा या परिसरात नियोजनानिमित्ताने आल्याच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच अयोध्या नगरीत आल्यावर इथल्या जनतेने आपलेसे केले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी शासन व प्रशासनातील सर्व वरिष्ठांचे आभार मानले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी शरयू नदीची पूजा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि हजारो भाविकांच्या साक्षीने विशेष महाआरती झाली. शरयू नदीच्या संपूर्ण परिसरात रोषणाई करण्यात आली. संपूर्ण वातावरण भक्तीमय होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतावेळी आतषबाजी करण्यात आली. राज्यातून खास गोंधळी लोककलेचे पथक शरयू नदीवर उपस्थित होते. महाआरतीच्या वेळी या पथकानेही आपल्या कलेचे प्रदर्शन केले.

याप्रसंगी ‘लक्ष्मण किल्ला’चे मैथलीशरण महाराज, शशीकांत महाराज, उत्तप्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंह, राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, कामगार मंत्री सुरेश खाडे, राज्यातील आमदार यासोबतच खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, तसेच संत-महंत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.