पाच राज्यांतील लसीकरण प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो गायब होणार? नक्की कारण काय?

मुंबई: लस घेतल्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात येत असल्याने वाद निर्माण झाला होता. आता, ५ राज्यांतील लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापण्यात येणार नाही. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणीपूर आणि उत्तराखंड या ५ राज्यात आचारसंहिता लागू असल्याने पंतप्रधान मोदींचा फोटो येथील प्रमाणपत्रावर येणार नाही. दरम्यान, ५ राज्यांत ७ टप्प्यात मतदान होत असून १० फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात होत आहे. तर, १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. देशात कोरोना महामारीचं संकट अद्यापही आहे, त्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारीपर्यंत रॅली, सभा, कॉर्नर सभांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच, कोविड नियमांचे पालन करूनच ही निवडणूक होणार असल्याचंही आयोगाने म्हटले आहे. त्यामुळेच, निवडणुकांपूर्वी सध्या वेगाने लसीकरण पूर्ण करायचं आहे. मात्र, आता ज्या ५ राज्यांत निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्या राज्यातील लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापला जाणार नाही. निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.

देशात वेगवान लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. कोरोनापासून संरक्षणासाठी केंद्र सरकारने मोहीम हाती घेत लसीकरण प्रक्रिया गतीने राबवली. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यामुळे लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो गायब करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली असून कोविन अ‍ॅपवर एक फिल्टरही लावण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!