खगोलप्रेमींसह विद्यार्थ्यांना या तारांगणाचा नक्कीच लाभ होईल – चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आज उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या चिखली येथील १०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे, ग.दि.माडगूळकर नाट्यगृह, सायन्स पार्क येथील 3D तारांगण व इतर कामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या महानगर पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.

मुंबईतील नेहरु तारांगणच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून सायन्स पार्क येथे 3D तारांगण उभारण्यात आले आहे. विज्ञान आणि खगोलशास्त्र विषयक माहिती एकाच छताखाली विद्यार्थ्यांना यामुळे उपलब्ध होणार आहे. खगोलप्रेमींसह विद्यार्थ्यांना या तारांगणाचा नक्कीच लाभ होईल असा विश्वास यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच नवीन प्रशासकीय इमारतींमुळे पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पडणार असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी मनपा आयुक्त शेखर सिंह, खासदर श्रीरंगअप्पा बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, उमाताई खापरे, आण्णा बनसोडे, माजी महापौर माई ढोरे यांच्या सह उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त व सर्व अधिकारी उपस्थित होते.