मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
पुणे : देशातील तीर्थक्षेत्रे वंदे भारत एक्सप्रेसने जोडणे सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतीच मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली. प्रवासी, भाविक आणि पर्यटक यांचा मोठा प्रतिसाद वंदे भारत एक्सप्रेसला मिळत असताना, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांच्याकडे मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत कोल्हापूरचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक करवीर नगरीत येत असतात. त्यासोबतच लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संपूर्ण जीवन काळात अनेक लोकोपयोगी योजना आणि उपक्रमांतून संपूर्ण जगासमोर नवा आदर्श घालून दिला. त्यामुळे कोल्हापूरला भेट देण्यासाठी येणारे भाविक आणि अभ्यासकांसाठी मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. मला आशा आहे, लोकभावनेचा विचार करुन मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध करून देतील असा विश्वास देखील चंद्रकांत पाटील यांनी या पत्राद्वारे व्यक्त केला आहे.
मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध झाल्यास अनेक प्रवासी, भाविक आणि पर्यटक यांना याचा फायदा होणार आहे. त्यासोबत मुंबई निवासी कोल्हापूरकरांसाठी देखील हि आनंदनाची बाब असणार आहे.