आगामी काळात समाजाची आवश्यकता लक्षात घेऊन अभ्यासक्रम राबविण्यात येणार – चंद्रकांत पाटील

अमरावती : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज अमरावती दौऱ्यावर आहे. या दरम्यान श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता, नवीन वास्तूचे लोकार्पण व ‘अमृतघन’ या ग्रंथाचे प्रकाशन कार्यक्रम चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, जगातील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये भारतीय सध्या उच्चपदावर आहेत. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे मूळ भारतीय वंशाचे आहेत. भारत हा तरूणांचा देश आहे. भारतीय विद्यार्थ्यांची ग्रहणशक्ती चांगली आहे. त्यांच्यासाठी येत्या काळात भरपूर संधी उपलब्ध आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे नुकतेच जर्मनीला जाऊन आले. तेथे 4 लाख कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. व्यवसायाभिमूख अभ्यासक्रम राबविल्यास तेथील गरज आपल्याला पूर्ण करता येऊ शकेल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्याची तयारी सुरू आहे. पण, त्याची कुणावरही सक्ती नाही. राज्यातील जवळपास 500 महाविद्यालयांनी यंदापासून शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करणे अपेक्षित आहे. मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे त्याला उशीर झाला. आमचे सरकार येऊन जेमतेम वर्ष झाले, तरीही आम्ही हे धोरण लागू करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. आगामी काळात समाजाची आवश्यकता लक्षात घेऊन अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार बी.टी. देशमुख, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रवीण पोटे आदी उपस्थित होते.