संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोरील नवनिर्मित जिल्हा क्रीडा संकुलाचे लोकार्पण व विविध क्रीडा सुविधांचे भुमीपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

35

अमरावती :संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोरील नवनिर्मित जिल्हा क्रीडा संकुलाचे लोकार्पण व विविध क्रीडा सुविधांचे भुमीपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. अमरावती जिल्ह्याला क्रीडा संस्कृतीचा जुना वारसा आहे. येथील जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मागील शंभर वर्षापासून क्रीडा क्षेत्रात काम करीत आहे. हजारो क्रीडा शिक्षक व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू या भूमीत निर्माण झाले आहे. येथील आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केले आहे. जिल्हास्तराप्रमाणे ग्रामीण भागातील मुला-मुलींनाही तालुकास्तरावरच क्रीडा सुविधा मिळाल्यास विद्यार्थी लहान वयापासूनच या क्षेत्राकडे वळतील. व आपसुकच युवा पिढीचे आरोग्यही सुधारेल. तालुकास्तरीय क्रीडा संकुलात आवश्यक सर्व क्रीडा सुविधा पुरविणार असे पाटील यांनी आज येथे केले.

पाटील म्हणाले की, आज जिल्हा क्रीडा संकुल लोकार्पण होत असतांना आनंद होतो की, संकुलाच्या 28 हजार चौ. मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्चरी रेंज, स्क्वॅश कोर्ट, आधुनिक जीम, कब्बड्डी, ज्युदो, कुस्ती, टेबल टेनिस इत्यादी क्रीडा सुविधा 11 कोटी निधीमधून निर्माण झालेले आहे. त्या लवकरच खेळाडूंसाठी खुल्या करण्यात येतील. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार तालुका क्रीडा संकुलाचे अनुदान मर्यादा 1 कोटीवरुन 5 कोटी, जिल्हा क्रीडा संकुलासाठी 8 कोटीवरुन 25 कोटी तर विभागीय क्रीडा संकुलासाठी 24 कोटीवरुन 50 कोटी वाढविण्यात आलेली आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. अमरावती जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा सुविधांचा लाभ घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू संकुलातून निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका, जिल्हा व विभागाच्या ठिकाणी महाराष्ट्र स्पोर्ट्स, महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अमरावती येथे जिल्हा क्रीडा संकुलासाठी 9 एकर शासकीय जागेत 14.32 कोटी रुपये प्राप्त निधीमधून जिल्हा क्रीडा संकुलामध्ये प्रशासकीय इमारत, इनडोअर हॉल, धनुर्विद्या रेंज, प्रेक्षक गॅलरी, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, विद्युतीकरण व जनरेटर इत्यादी कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेली आहे. ही सर्व कामे कमी वेळेमध्ये करण्यात आली असून उच्चदर्जाची व सुबक आखणी करुन या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा क्रीडा संकुलामध्ये विविध क्रीडा सुविधांचा विद्युत वापर कमी करण्यासाठी संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुलात सोलर सिस्टम बसविणे व हायमास फ्लड लाईट लावणे या कामास 50 लक्ष खर्च अपेक्षित आहे. ही कामे महाउर्जा विकास अधिकारण या यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या धर्तीवर तालुका पातळीवर सर्व क्रीडा सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करुन देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार सुलभा खोडके, आमदार रवि राणा, जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष जिल्हा क्रीडा संकुल समिती सौरभ कटियार, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाचे विजय संतान, राज्य धर्नुविद्या संघटनेचे अध्यक्ष ॲङ प्रशांत देशपांडे, सचिव अमर राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदी यावेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.