लुटारू काँग्रेसला रोखून ‘लुक ईस्ट’ धोरणामुळे ईशान्येकडील राज्यांचा विकास -पंतप्रधान नरेंद्र मोदी

91

त्रिपुरा : भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या दहा वर्षांत ईशान्येकडील राज्यांच्या विकासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले असून आता संपूर्ण  देश भाजपाच्या लुक ईस्ट धोरणानुसार पुढे जात आहे. काँग्रेस-इंडी आघाडीचे ‘लूट ईस्ट’ धोरण थांबवून मोदी सरकारने अवलंबिलेल्या लुक ईस्ट धोरणातून ईशान्येकडील राज्यात विकास आणि लोककल्याणाची असंख्य कामे होत आहेत. समृद्ध भारताच्या भाजपाच्या संकल्पात ईशान्येकडील राज्यांच्या विकासाचा मोठा वाटा असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्रिपुरातील आगरतळा येथे झालेल्या प्रचंड जाहीर सभेत बोलताना केले.

काँग्रेस आणि इंडी आघाडीतील राजकीय पक्षांनी ईशान्येकडील राज्यांसंदर्भात नेहमीच संधिसाधू भूमिका घेतली असून यामुळेच या भागाचा विकास रखडला, असेही मोदी म्हणाले. पूर्वी राजकीय पक्षांना केवळ मतांच्या राजकारणापुरतीच ईशान्य भारताची आठवण यायची, काँग्रेस व इंडी आघाडीतील पक्षांनी ईशान्येसाठी केवळ लुटीचेच धोरण अवलंबिले, पण दहा वर्षांपूर्वी भाजपा सरकार सत्तेवर आल्यावर ‘लूट ईस्ट’ धोरण थांबवून आम्ही ‘लुक ईस्ट धोरण’ अवलंबिले, आणि विकासाची वाटचाल सुरू झाली असा दावा मोदी यांनी केला. ही वाटचाल अखंड सुरू रहावी यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वा मार्क्सवादी कम्युनिस्ट सारख्या संधिसाधू पक्षांना संधी न देता भाजपाला मोठ्या मतांनी विजयी करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. मी असा पहिला पंतप्रधान आहे, ज्याने गेल्या 10 वर्षांत 50 हून अधिक वेळा ईशान्येला भेट दिली आहे, काँग्रेस सरकारमधील अनेक मंत्र्यांना तर त्रिपुरा भारताच्या नकाशावर कुठे आहे हे देखील माहित नव्हते, असा टोला मोदी यांनी लगावला. संधिसाधू इंडी आघाडीचे भ्रष्टाचाराचे दुकान वाचवण्यासाठी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले आहेत. याच संधिसाधूपणामुळे ते त्रिपुरामध्ये ते एकत्र लढत आहेत पण केरळमध्ये ते एकमेकांविरोधात लढत आहेत. तिकडे केरळमध्ये काँग्रेस कम्युनिस्टांना दहशतवादी म्हणते आणि कम्युनिस्ट काँग्रेसला भ्रष्ट म्हणतात, अशा शब्दांत त्यांनी इंडी आघाडीच्या राजकारणाची खिल्ली उडविली. भाजपा सरकारने गेल्या दशकात त्रिपुराच्या विकासासाठी जे काही केले तो तर केवळ ट्रेलर आहे, ईशान्येला अजून बरेच पुढे जायचे असून विकासाचा मोठा पल्ला गाठायचा आहे. पुढील पाच वर्षांसाठी भाजपाने सादर केलेले  संकल्पपत्र त्रिपुरातील जनतेसाठी विकासाची नवी दारे उघडणार आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी त्रिपुरातील जनता जीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट सरकारने त्रिपुरामध्ये पीएम आवास योजना खंडित करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्वतोपरी प्रयत्नांनी राज्यात साडेतीन लाखांहून अधिक पक्की घरे बांधली आहेत. येत्या पाच वर्षांत देशात तीन कोटी नवीन घरे बांधली जातील, व या योजनेचा मोठा लाभ त्रिपुरातील जनतेला मिळेल, असा संकल्प भाजपा ने केला आहे. देशातील प्रत्येक लाभार्थ्याला पाच वर्षे मोफत रेशन मिळत राहील, जेणेकरून एकही गरीब मुलगा उपाशी राहणार नाही, ही मोदींची हमी आहे. भारतीय जनता पार्टीने आपल्या संकल्प पत्रात आयुष्मान योजनेंतर्गत 70 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचा शब्द दिला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीचे सरकार हायवे, इंटरनेट, रेल्वे, एअरवेजच्या माध्यमातून ईशान्येच्या विकासासाठी पुढे जात आहे. आज त्रिपुरामध्ये तीन हजार कोटी रुपये खर्चून चार पदरी महामार्गाचे काम सुरू आहे. पश्चिम आगरतळा बायपासचे कामही येत्या दोन-तीन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्रिपुराला बांगलादेशाला जोडण्यासाठी काही वर्षांपूर्वी मैत्री सेतू सुरू करण्यात आला होता. एकेकाळी त्रिपुरामध्ये मोबाईल सिग्नलही उपलब्ध नव्हते, आज फाईव्ह-जी सेवा विस्तारत आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या राजवटीत मोबाईल सुविधांच्या किंमती गगनाला भिडत होत्या, मात्र मोदी सरकारने मोबाईल डेटा स्वस्त केल्यामुळे प्रत्येक वर्गातील लोक इंटरनेट वापरत आहेत. कोरोनाच्या काळात गरीब मुलेही मोबाईल आणि इंटरनेट सुविधांद्वारे अभ्यासाशी जोडलेली राहिली. असे पंतप्रधान म्हणाले. त्रिपुरातील रेल्वे वाहतुकीचे जाळे 10 वर्षांत राज्य एक डझनहून अधिक गाड्यांद्वारे जोडले गेले आणि रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम वेगाने पूर्ण झाले. आगरतळा विमानतळावर नवीन आणि आधुनिक टर्मिनल बांधण्यात आले. त्रिपुराचे भाजपा सरकार एक पाऊल पुढे टाकत आहे आणि राज्याच्या विकासासाठी इरा प्लस मॉडेलवर काम करत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

आपल्या तडाखेबंद भाषणात मोदी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही हल्ला चढविला. काँग्रेसचे युवराज उत्तर प्रदेशातील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आपली इज्जत वाचवण्यासाठी केरळला पळून गेले होते. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या युवराजांविरोधात आवाज उठवला असून त्यावर केरळचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारात अडकले असून त्यांच्यावर कारवाई करावी, असे विधान काँग्रेसच्या युवराजांनी केले आहे. युवराजांवर कोणी टीका केली, तर त्या व्यक्तीला तुरुंगात टाकावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे, हेच यावरून स्पष्ट होते असे ते म्हणाले. भ्रष्टाचारात गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, असा भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे. भाजपा  सरकारने केरळच्या मुख्यमंत्र्यांबद्दल सत्य बाहेर आणल्यावर काँग्रेस गप्प बसते. तपास यंत्रणेने कारवाई सुरू करताच विरोधी पक्ष आक्रमक झाले, हाच काँग्रेसचा खरा चेहरा आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा संकल्प भ्रष्टाचार हटवण्याचा आहे, तर दुसरीकडे भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणे हा इंडी आघाडीचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक शाह, भाजपा प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य, त्रिपुरा पूर्व लोकसभा उमेदवार महाराणी कृती सिंह देबबर्मा आणि पश्चिम त्रिपुरा लोकसभा उमेदवार बिप्लब कुमार देब यांच्यासह भाजपाचे अन्य नेते या सभेत मंचावर उपस्थित होते.काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाला दिलेले प्रत्येक मत व्यर्थ जाईल आणि भाजपाला दिलेले प्रत्येक मत देशातील विकसित भारताचा पाया मजबूत करेल. त्रिपुराच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी 19 आणि 26 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाला प्रचंड मतांनी विजयी करा आणि त्रिपुराचे भविष्य निश्चित करा, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले .

Get real time updates directly on you device, subscribe now.