कलिना संकुलामधील सोयी-सुविधांच्या पाहणीसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पाच सदस्यांची समिती स्थापन करणार  – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

40

मुंबई : मुंबई विद्यापीठ हे जगातील मोठे विद्यापीठ आहे. विद्यापीठाचा जगात नावलौकिक आहे. विद्यापीठाचे कलिना कॅम्पसमध्ये न्यू गर्ल्स वसतिगृह आहे. तेथील सुविधांबाबत विद्यार्थिनींच्या तक्रारी होत्या. तरी संपूर्ण कॅम्पसमधील सोयी-सुविधा, स्वच्छता तसेच वसतीगृहातील सुविधा आणि सद्य परिस्थितीसंदर्भात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती कॅम्पसला भेट देऊन सुविधांची पाहणी करेल, असे आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की, अनेक विद्यापीठे आता स्वायत्त आहेत. विद्यापीठ प्रशासन, त्यांच्या व्यवस्थापनावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल. कलिना संकुल परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडे तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. याबाबत प्रस्तावाचे सादरीकरण घेऊन योग्य प्रस्तावाची निवड करण्यात येईल. त्याद्वारे  या परिसराचा विकास करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.
 
याबाबत सदस्य पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आशीष शेलार, अस्लम शेख यांनीही भाग घेतला.
 

Get real time updates directly on you device, subscribe now.