‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील संगीत शिक्षणाला नवी दिशा मिळेल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : मुंबईतील कलिना कॅम्पस येथे उभारण्यात येत असलेल्या ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालया’च्या नवीन इमारतीच्या बांधकामाची आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. राज्यातील संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, संबंधित अधिकाऱ्यांना काम दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या.

संगीत क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तसेच विविध कलांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय प्रेरणादायी आणि आधुनिक व्यासपीठ ठरणार आहे. अत्याधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि जागतिक दर्जाचे संगीत शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी पाटील यांनी म्हटले.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील संगीत शिक्षणाला नवी दिशा मिळेल आणि भविष्यात महाराष्ट्र देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील संगीत शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित मान्यवर उपस्थित होते.