राज्यातील एनसीसी प्रशिक्षणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी एनसीसी महत्त्वाचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

8

मुंबई : राष्ट्रीय छात्र सेना (NCC) ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासोबतच देशहिताची भावना निर्माण करणारी प्रभावी चळवळ असून राज्यातील एनसीसी प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील एनसीसी स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स आणि प्रशिक्षण केंद्रांशी संबंधित विविध सुविधा, प्रशिक्षण व्यवस्था आणि नियोजन याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, एनएसएस विभागाचे संचालक मिलिंद काळे, एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी, एनसीसी ग्रुपचे ग्रुप कॅप्टन के. डी. दीपक, कमांडर पी. सुदान, महाराष्ट्र नौदलचे मेजर ईशान कृष्णा तसेच एनसीसी गर्ल्स बटालियनचे अधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, एनसीसी ही केवळ शैक्षणिक उपक्रमांची योजना नसून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, शिस्त, राष्ट्रसेवा आणि संघटन कौशल्य विकसित करणारे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. विद्यार्थ्यांचा प्रशिक्षणामध्ये अधिकाधिक सहभाग वाढण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून प्रशिक्षणाचे नियोजन अधिक प्रभावी आणि कालबद्ध पद्धतीने करण्यात यावे.

मुंबई आणि नागपूरसारख्या महानगरांमध्ये जागेच्या अडचणी असल्याचे निदर्शनास आले असून त्या तातडीने दूर करण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन एनसीसी प्रशिक्षणासाठी स्वतंत्र व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही पाटील यांनी दिले.

राज्याच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून एनसीसीसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्व क्षमता, शिस्त आणि राष्ट्रभक्तीची भावना विकसित होत असल्याचे सांगत अशा योजनांना शासनाकडून अधिक बळ दिले जाईल, असेही पाटील यांनी नमूद केले.

एनएसएसप्रमाणेच एनसीसी ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासोबतच देशहिताची भावना निर्माण करणारी प्रभावी चळवळ असून राज्यातील एनसीसीमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी तसेच एनसीसी प्रशिक्षण अकादमीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.
राज्यामध्ये एनसीसीसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागेची उपलब्धता कशाप्रकारे करता येईल तसेच प्रशिक्षण केंद्रांना आवश्यक सोयी-सुविधा कशा पुरवता येतील, याबाबत एनसीसी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री इंटर्नशिप स्कीम (PMIS) अंतर्गत युवकांना अधिकाधिक सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.