ज्येष्ठ पैलवान दिलीप सूर्यवंशी यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भावपूर्ण श्रद्धांजली; निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे केले सांत्वन
सांगली : मल्लविद्येच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पैलवान दिलीप सूर्यवंशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. सांगलीचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवंगत दिलीप सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी मंत्री पाटील यांनी शोकाकुल सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि या कठीण प्रसंगी आम्ही आपल्या दुःखात पूर्णपणे सहभागी आहोत, असा धीर दिला.
आपल्या शोकभावना व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ज्येष्ठ पैलवान दिलीप सूर्यवंशी यांचे जाणे हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींसाठी अत्यंत वेदनादायी आहे. मल्लविद्येसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि सूर्यवंशी कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.