डीपीसीतून पोलीस दलासाठी प्राप्त 27 वाहनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

7

सांगली : जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस दलास प्राप्त २७ वाहनांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदिंसह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस दलासाठी वाहने, अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने, पोलीस ठाण्यांसाठी इमारती अशा विविध माध्यमातून पोलीस दलाला बळकटीकरण करण्यात येत आहे. अशा उपाययोजनांतून गुन्हेगारांवर वचक बसून कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी मदत होणार आहे, असे ते म्हणाले.

जिल्हा वार्षिक योजने योजनेतून पोलीस दलाचे आधुनिकीकरण करणे, वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण करणे, अंतर्गत ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सन २०२६-२७ च्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 3,19,62,543/- रूपये इतक्या किमतीची एकूण २७ वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये एक्सयुव्ही ७ एक्सओ – ०२, स्कॉर्पिओ – ०५, बोलेरो – १४, ट्रॅक्स तुफान – ०५, आयशर ट्रक – ०१ अशी वाहने मा. पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून सांगली जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेली आहेत.

सदर वाहनांचा आपत्कालिन परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत करण्यास उपयोग होणार असून पोलीस दलास कायदा व सुव्यवस्था तसेच सर्व सामान्य नागरिकांची सुरक्षा इत्यादी करिता प्रभावीपणे कामगिरी करण्यात या वाहनांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.