मुलींना आता खासगी आणि अभिमत विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्कात पाच लाखांपर्यंतची शुल्क सवलत मिळणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

35

पुणे : दैनिक महाराष्ट्र टाईम्सच्या वतीने आयोजित स्त्री शिक्षणासाठी पुढचे पाऊल चर्चासत्राचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या पुढाकाराबाबत पाटील यांनी यावेळी विस्तृत माहिती दिली. राज्यातील अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, मुलींना आता खासगी आणि अभिमत विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्कात पाच लाखांपर्यंतची शुल्क सवलत मिळणार आहे,’ असा निर्णय चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला.

राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण; तसेच परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत लागू केली आहे. या निर्णयाच्या परिणामकारक अंमलबजावणी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘स्त्री शिक्षणासाठी पुढचे पाऊल’ या विषयावर आयोजित केलेला ‘पुणे सुपरफास्ट’ कार्यक्रमात पाटील बोलत होते. या वेळी पुणे शहरातील उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कुलगुरू, संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय घेतला असून, त्याचा राज्यातील असंख्य मुलींना लाभ होतो आहे. यापूर्वी सहाशेपेक्षा जास्त कोर्सेसच्या शैक्षणिक फी माफीचा शासन आदेश जारी केला होता‌‌. आजच २५३ कोर्सेसना शंभर टक्के फी माफीचा शासन आदेश जारी झाला आहे, अशीही माहिती यावेळी दिली.

राज्यात खासगी आणि अभिमत विद्यापीठांची संख्या वाढत असून, त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींची संख्याही आहे. या पार्श्वभूमीवर खासगी आणि अभिमत विद्यापीठांमध्ये मुलींना सवलत देण्याबाबत चर्चा सुरू होती. या विद्यापीठांमध्ये शुल्क सरासरी १२ लाखांच्या जवळपास आहे. या शुल्काची संपूर्ण रक्कम देणे शक्य नाही. त्यामुळे विविध अभ्यासक्रमांना पाच लाखांपर्यतची शुल्क सवलत मुलींना मिळणार आहे. त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांच्या आत असणे अपेक्षित आहे,’ अशी माहिती पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे खासगी आणि अभिमत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थिंनींना लाभ मिळणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.