स्मार्ट उद्यान, बेजबाबदार नागरिक, निद्रस्त प्रशासन; डायनोसॉर पार्क

138

चिंचवड : उद्यानं हि खर तर शहराच्या सौंदर्यात भर घालत असतात आणि पिंपरी चिंचवड तस अनेक उद्यानांचे शहर. यातीलच एक उद्यान म्हणजे पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान ज्याची ओळख आता डायनोसॉर पार्क म्हणून आहे. उत्तम संकल्पना आणि जागेच योग्य नियोजन केलेलं हे उद्यान पाहण्याचा मोह नागरिकांना आवरत नाही. टाकाऊ स्टील पासून बनविलेले भले मोठे डायनोसॉरच्या वेगवेगळ्या प्रजातींचे पुतळे, संध्याकाळी सुरु होणारी आकर्षक विद्युत रोषणाई खऱ्या अर्थाने विलोभनीय आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून हि अनेक इन्फ्लुएन्सर या पार्कच्या छान रील बनवितात आणि येथे आवर्जून भेट देण्याचा सल्ला देखील देतात आणि दिलाच पाहिजे. पण दुसरीकडे जशी सुट्टीच्या दिवशी गर्दी वाढत आहे तसे उद्यान व्यवस्थापनाचे तीनतेरा झालेले पाहायला मिळत आहे.

रोख तिकीट विक्री,अतिक्रमण व रांगा

पंतप्रधान मोदीजी यांच्याकडून डिजिटल इंडियाचे आवाहन करण्यात येत असले तरी इथे मात्र रोख रक्कम असल्याशिवाय नागरिकांना तिकीट मिळत नाही. सुट्टीच्या दिवशी लांबच्या लांब रांगा त्यामुळे पाहायला मिळतात. यातील बहुतांश लोक एकमेकांना रोख रक्कम मागताना दिसतात. कर वसुलीसाठी ऑनलाईन आग्रह धरणारी महानगरपालिका तिकिटाचे पैसे ऑनलाईन का घेत नसेल, स्मार्ट सिटीचा उद्यान विभाग कधी स्मार्ट होणार हा प्रश्न यावेळी पडतो. तिकिटाच्या रांगा हि येथे लागू शकत नाहीत कारण उद्यानाच्या प्रवेश द्वारासमोर झालेले अतिक्रमण. नक्की उभे कुठे राहायचे ते हि सामान्य नागरिकाला कळायला मार्ग नसतो. या अतिक्रमणाला महानगरपालिका प्रशासन का पाठीशी घालत आहे ? हे अनुत्तरित आहे.

नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष

उद्यानाच्या प्रवेशद्वारातून आत जाताच उजव्याबाजूला असणारा सूचना फलक शोभेचा असल्याचा प्रत्यय आत गेल्यावर येतो. लोखंडी, अनेक भाग टोकदार असणारे डायनोसॉरचे पुतळे ज्यांना हात लावू नका इजा होऊ शकते, फुले तोडू नका, इतर क्रिकेट, बॅडमिंटन इ. सारखे मैदानी खेळ उद्यानात खेळू नका, स्वच्छता राख अशा सूचना असताना देखील वयाने लहान असणारी मुले त्या कलाकृतींच्यावर उभे राहून खेळताना, फोटो काढताना दिसतात त्यांना यासाठी प्रोत्साहन देणारे पालक पाहून आश्यर्य वाटते. एखाद्याचाही तोल गेला तर गंभीर इजा होऊन मोठी हानी याठिकाणी होऊ शकते. सुंदर असे मोराचे शिल्प आणि पिसाऱ्याच्या रूपाने जोडलेला फुललेला उद्यानाचा भाग हे देखील आकर्षणाचा भाग आहे पण नागरिक त्या फुलांवर देखील जाऊन बसलेले दिसतात. सूचना फलक लावून नागरिक ऐकत असतील तर पोलीस किंवा इतर प्रशासकीय यंत्रणांची गरज देखील लागली नसती. पण या उद्यानात या नागरिकांना यापासून रोखण्यासाठी एक किंवा अधिक अपेक्षित शासकीय सुरक्षा रक्षक नाहीत किंवा ते असून दिसत नाहीत.

उद्यानाची क्षमता आणि स्वच्छता

आकर्षण असलेल्या या उद्यानात लहान मुलांसह सर्व वयोगटातील नागरिकांची गर्दी सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात असते. हजारो लोक काही तास तेथे उपस्थित असतात. पण तिकीट विक्री करताना आतमध्ये किती लोक आहेत ? गर्दीची परिस्थिती काय आहे ? हे देखील पाहिले जात नाही. सामान्य कुटुंब गेलं तर हे ओव्हर क्राऊडेड उद्यान किती भावेल याबाबत शंका येते. उद्यानाबाहेरील खाद्य पदार्थ आत घेऊन जात नागरिक मिळेल त्याजागी कचरा टाकताना पाहायला मिळतात. त्यामुळे जागोजागी अस्वच्छता पाहायला मिळते. उद्यानात असणारे डायनोसॉरच्या लहान आकाराचे कचऱ्याचे डबे असणाऱ्या गर्दीत दिसूनही येत नाहीत किंवा कचऱ्याने ओसंडून वाहत असतात.

एकंदरीतच विचारायला कोणी नाही त्यामुळे येणारा नागरिक मिळेल त्याजागी नियमांना धाब्यावर टांगून आनंद घेताना दिसतो. स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील अनेक उद्यानांची स्थिती कदाचित हीच असेल पण कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या कलाकृती, उद्याने जपण्याचे काम देखील प्रशासनाने योग्यरित्या करणे गरजेचे आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.