नागपूर शहर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर! जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून रेकी

9

नागपूर: भारताविरुद्ध नेहमी दहशतवादी कारवाया केल्या जातात. पाकिस्तान किंवा अनेक संघटनांकडून भारताविरोधात कट रचल्याचही आजपर्यंत बऱ्याच वेळा समोर आलंय. मात्र यावेळी राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर शहर सध्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे. कारण, पाकिस्तानच्या जैश- ए -मोहम्मद या संघटनेकडून नागपुरात रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय आता पोलीसही सतर्क झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी संवेदनशील भागातील सुरक्षा वाढवली असून.सेंट्रल एजन्सी कडून पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली होती.

नागपुरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, हेडगेवार स्मारक यासह अनेक महत्वाची ठिकाणं आहेत. दहशतवाद्यांनी शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. शिवाय नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, शहराच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सज्ज आहोत. ज्या ठिकाणी रेकी केल्याचे बोलले जाते त्या ठिकाणी मोठी सुरक्षा वाढवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जैश ए मोहम्मद या संघटनेने नागपुरात येऊन रेकी का केली याबाबत आता सुरक्षा एजन्सी तपास करत आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणांची रेकी केली त्या भागाची माहिती सध्या उघड केली जाणार नाही असंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय. 26 जानेवारी रोजी काही घातपात होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.