तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करणार – रुपाली चाकणकर

पुणे : पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप झाल्यानंतर रुग्णालयाने देखील एक चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल समोर आला आहे. यासोबतच आज शासकीय समितीच्या अहवालाची माहिती राज्य शासनाला आणि महिला आयोगाला देण्यात येत आहे. भिसे कुटुंबीयांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांची भेट घेऊन त्यांना एक लेखी पत्र देखील दिलं आहे. आज यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. याबाबत चाकणकर यांनी माध्यमांना माहिती दिली.
चाकणर यांनी तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ रूग्णालय जबाबादार असल्याच म्हटलं. रूग्णालयाने रूग्णाची खासगी माहिती अहवालातून दिल्याने चाकणकरांनी निषेध व्यक्त केला असून याबाबत त्यांनी दीनानाथ रूग्णालयाला समज देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी तनिषा भिसे यांच्या आजारा बाबतच्या गोपनीय गोष्टी सार्वजनिक केल्या. रुग्ण आणि नातेवाईक 28 मार्चला नऊ वाजता रुग्णालयात गेल्यावर दहा लाख रुपयांची मागणी केली. अडीच वाजता रुग्ण मंगेशकर रुग्णालयातून बाहेर पडला. साडेपाच तासात रूग्णालयाने तनिषा भिसे यांच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत त्याउलट त्यांना त्यांच्याजवळ असलेली गोळी घेण्याचा सल्ला दिला होता.
रूग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेशकर रुग्णालयाने आमच्यावर उपचार करायला तयार असल्याचं सांगितलं. शस्त्रक्रिया करण्याची सर्व तयारी झालेली असताना मात्र, पैसे वेळेत भरु न शकल्याने उपचार केले नाहीत. त्यामुळे रूग्णालयावरती ठपका ठेवण्यात आला आहे. तब्बल साडेपाच तास पेशंट रुग्णालयात होता, रक्तस्त्राव सुरूच होता, यावेळी रुग्णाचं मानसिक खच्चीकरण झालं. रूग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणं आवश्यक होतं, त्यांनी उपचार करणं गरजेचं होतं, पण त्यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती यावेळी रुपाली चाकणकरांनी दिली.
चाकणकर पुढे म्हणाल्या कि, गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू हा माता मृत्यू असल्याने याबाबतचा अंतीम अहवाल माता मृत्यू अन्वेशन विभागाकडून आज संध्याकाळपर्यंत सादर होणार आहे. तर आणखी एक अहवाल धर्मादायक विभागाकडून उद्या सादर होईल. या दोन्ही विभागांचे अहवाल आल्याशिवाय कारवाई करण्यात येणार नाही. उद्या तिन्ही अहवालांचे निष्कर्ष पाहिल्यावर कारवाई काय करायचे हे ठरेल, पेशंटला योग्य उपचार मिळाले नाहीत असा शासनाचा अहवाल आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. साडेपाच तास गर्भवती महिला ही रुग्णालयातच होती. त्या तासाच रुग्णालयाने योग्य ते उपचार केले नाहीत. त्वरित उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता. पण मंगेशकर रुग्णालयाने कोणतीही नियमावली पाळली नाही. त्यामुळे रुग्णालयावर कायदेशीर कारवाई होणार असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.
रुग्णालयात धर्मदाय नाव असावे. तसेच आयोग जेव्हा कारवाई करत असते तेव्हा कोणत्या पक्षाचा आहे, ते पाहिले जात नाही. कोणी कोणत्याही पक्षाचा असला तरी चुकीचा असेल तर कारवाई होणार. सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करणार. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे आश्वासन रूपाली चाकणकर यांनी यावेळी बोलताना दिले.