महिलांना त्रास देणाऱ्या कंपन्यांना टर्मिनेट करण्यात येईल – रुपाली चाकणकर

पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज (मंगळवारी) पुणे महानगरपालिकेत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महिलांच्या समस्या सोडवण्याची सुरुवात केली आहे. महापालिका महिला कर्मचाऱ्यांच्या  तक्रारींवर त्यांनी लक्ष देत संबंधित महिलांना न्याय देण्यासाठी त्यांनी कमिटीही तयार केली. तसेच, जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातही तिथल्या महिला अधिकाऱ्यांना महिलांच्या समस्येबाबत कारवाई करण्यासाठी कमिटी गठीत करण्याचे आदेश चाकणकर यांनी दिले आहेत. कुठल्याही क्षेत्रीय कार्यालयात अशा प्रकारची कमिटी नसेल तर 50 हजार रुपये दंड करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.

त्यावेळी बोलताना रूपाली चाकणकर  म्हणाल्या, ‘महिला स्वच्छतागृहांमध्ये केअर टेकर जर महिला नसेल, पुरुष केअर टेकरकडून कोणत्याही प्रकारचा त्रास दिला गेला असेल तर त्या महिलांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करावी. महिला स्वच्छतागृहांना सुधारलं जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, तेजस्विनी या महिला स्पेशल बसमधून कधीही कोणत्याही पुरुषानं प्रवास करणं चालणार नाही. तसं आढळल्यास महिला आयोग, पीएमपीएमएल कार्यालय यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल. पीएमपीएमएल मध्ये मोठ्या प्रमाणावर अनुकंप तत्वावर महिला कर्मचारी आहेत.’ असं त्या म्हणाल्या.

‘खासगी किंवा सरकारी यंत्रणेत, कंपनीत काम करणाऱ्या महिलांवरील अत्याचाराबाबत त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयात त्या तक्रार दाखल करू शकतील. त्यांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. त्रास देणारी वरिष्ठ महिला अधिकारी असेल तरी ती आरोपीच आहे, म्हणून तिच्यावरही कारवाई केली जाईल. कंपनीचा दोष आढळल्यास कंपनी टर्मिनेट  करण्यात येईल. त्रास देणारे अधिकारी, बॉस यांना त्यांच्या पदावरून हात धुवावा लागेल. असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.