वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा एक प्रेरणापूंज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संभाजी नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि दुसरीकडे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आहेत. त्यामुळे येथे प्रेरणेची कुठलीही कमतरता नाही, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंडित नरेंद्र मिश्र यांच्या कवितेच्या माध्यमातून वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्याचे, वीरतेचे, तेजाचे वर्णन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अकबराने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांना मांडलिकत्व स्विकारण्याचा प्रस्ताव पाठवला. पण, राष्ट्रभक्त, देशभक्त, वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांनी प्राणांची पर्वा न करता अकबराचा प्रस्ताव धुडकावून लावला आणि ते शेवटपर्यंत लढत राहिले. देशात एका बाजूला वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह, दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि तिकडे गुरु तेगबहादूर होते. या सर्वांनी आपल्या जीवनाचे बलिदान दिले पण मोगलांचे मांडलिकत्व स्विकारले नाही. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो त्याचे बीजारोपण त्या काळात या महापुरुषांनी आमच्या रक्तामध्ये केले. म्हणून भारताला आपण स्वतंत्र करु शकलो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा एक प्रेरणापूंज आहे. या प्रेरणास्रोताच्या माध्यमातून स्वतंत्र भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची मानके, राष्ट्रपुरुष आणि सांस्कृतिक वारशाला पुनरुज्जीवित करण्याचे काम सुरु आहे. अशा पर्वकाळात वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह विराजमान झाले. आपण सर्वच वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या मार्गाने चालण्याचा निर्धार करुया, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार रावल, खा. डॉ. भागवत कराड, आ. नारायण कुचे, आ. प्रशांत बंब, आ. संजय केणेकर, आ. अनुराधा चव्हाण, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचे वंशज लक्ष्यराजसिंह मेवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.