संसदीय कार्य विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात तीन मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा संपन्न

6

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या संसदीय कार्य विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, विभागाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता, गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज मंत्रालयात तीन महत्त्वपूर्ण मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन संपन्न झाले. यामध्ये ‘विधानमंडळाचे कामकाज हाताळताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना’, ‘संसदीय कार्य विभागाची माहिती पुस्तिका’ आणि ‘सारसंग्रह’ यांचा समावेश आहे.

याबाबत पाटील म्हणाले, १ जुलै १९७५ रोजी स्थापना झालेला हा विभाग राज्य शासन आणि विधानमंडळ यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करत आहे. ५० वर्षांच्या प्रवासात विभागाने ‘स्व-मार्गदर्शिका’ प्रकाशित करण्याची ही पहिलीच वेळ असून, या पुस्तिका सुशासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील, असा विश्वास मी यावेळी व्यक्त केला. ८ जानेवारी २०१६ रोजी स्वतंत्र विभाग म्हणून अस्तित्वात आलेल्या या विभागाच्या बळकटीकरणासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे देखील यावेळी पाटील म्हणाले.

या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, संसदीय कार्य विभागाचे सचिव सतीश वाघोले, सहसचिव प्रभाकर पवार, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर तसेच विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.