‘साधना सप्ताह २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पंतप्रधान मोदींकडून ‘टीम महाराष्ट्र’चे कौतुक… पंतप्रधानांचे कौतुक आमच्यासाठी प्रेरणादायी – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत पार पडलेल्या ‘साधना सप्ताह २०२६’ मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावून एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल स्वतः पंतप्रधान मोदीजींनी पत्राद्वारे ‘टीम महाराष्ट्र’चे विशेष कौतुक केले असून, हे कौतुक सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती देताना म्हटले, राज्याने या मोहिमेत ४६,९४,५९७ कोर्सेस पूर्ण करण्याचा विक्रम तर केलाच, पण त्यासोबतच ६,५९,७५९ कर्मचाऱ्यांनी एआय-विशिष्ट (AI-specific) प्रमाणपत्रे मिळवून आधुनिक आणि तंत्रस्नेही प्रशासनाकडे आपली पावले वेगाने पडत असल्याचे सिद्ध केले आहे. iGOT कर्मयोगी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेतलेले हे प्रशिक्षण महाराष्ट्राच्या कार्यक्षम आणि लोकाभिमुख कारभाराला अधिक सक्षम करेल, असा विश्वास असल्याचे देखील पाटील यांनी म्हटले.
या प्रवासात आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आणि या मोहिमेला बळ देणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले तसेच या मिशनमध्ये अहोरात्र कष्ट घेणाऱ्या राज्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचे देखील त्यांनी मनापासून अभिनंदन केले. आपल्या सर्वांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळेच महाराष्ट्र आज देशात अव्वल ठरला आहे, असे वक्तव्य पाटील यांनी केले.