गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय मुलींचा डंका; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला अभिमान, श्रेया मुंदडाचे विशेष कौतुक

6

मुंबई : फ्रान्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या १५ व्या ‘युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड’ (EGMO) मध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. जगातील ६७ देशांच्या चुरशीच्या स्पर्धेत भारतीय संघाने सहावा क्रमांक पटकावून जागतिक स्तरावर आपल्या गणितातील कौशल्याची मोहोर उमटवली आहे. विशेष म्हणजे, मुंबईची सुकन्या श्रेया मुंदडा हिने या प्रतिष्ठित स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देशासाठी सुवर्णमयी इतिहास रचला आहे.

मुंबईची रहिवासी असलेल्या श्रेया शंतनू मुंदडा हिने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रेया व्यतिरिक्त भारतीय संघातील संजना फिलो चाको (केरळ) हिने रजतपदक, तर शिवानी भारथ कुमार (तमिळनाडू) हिने कांस्यपदक जिंकले आहे. भारताने मिळवलेला सहावा क्रमांक हा या स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वोत्तम क्रमांक ठरला आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या यशाबद्दल भारतीय संघाचे आणि विशेषतः श्रेया मुंदडाचे कौतुक केले आहे. “भारतीय संघाने ६७ देशांच्या स्पर्धेत सहावा क्रमांक पटकावणे ही संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. यात महाराष्ट्राच्या श्रेयाने सुवर्णपदक जिंकून राज्याचा मान उंचावला आहे,” अशा शब्दांत पाटील यांनी आपला आनंद व्यक्त केला. श्रेया मुंदडा हिचे आणि संपूर्ण भारतीय संघाचे या सुवर्णमयी यशाबद्दल पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

या यशामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, गणित क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना यामुळे मोठी प्रेरणा मिळणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.