वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले श्रींचे दर्शन; सोमनाथ मंदिराच्या भव्य प्रतिकृतीचे केले कौतुक

13

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणरायाचे अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या या मंगलमय पर्वावर त्यांनी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन विधिवत पूजन केले आणि महाराष्ट्राची प्रगती, जनतेचे सुख-समृद्धी तसेच उत्तम आरोग्यासाठी लाडक्या गणरायाकडे मनःपूर्वक प्रार्थना केली.

यावर्षी मंडळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या श्री सोमनाथ मंदिराची भव्य आणि देखणी प्रतिकृती साकारली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कलाकृतीची आस्थेने पाहणी करत दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेची जपणूक करण्यासोबतच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणाऱ्या मंडळाच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

दर्शन सोहळ्यानंतर त्यांनी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला आणि उपस्थित सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या मंगल प्रसंगी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.