उच्च शिक्षण रोजगाराभिमुख आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ‘महाराष्ट्र राज्य उच्चस्तर शिक्षा परिषदेची’ (State Council for Higher Education) अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आज संपन्न झाली. राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला अधिक सक्षम आणि प्रगत बनवण्यासाठी या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकी दरम्यान राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या नवनवीन उपाययोजना, शैक्षणिक गुणवत्तावाढ , आधुनिक शिक्षण पद्धतींची प्रभावी अंमलबजावणी तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचा सविस्तर आढावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला.
याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, नाविन्यपूर्ण आणि थेट रोजगाराभिमुख करण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्रातच मिळावे, यासाठी आवश्यक असणारे निर्णय आणि धोरणात्मक उपाययोजनांवर या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, रुसा (RUSA) चे प्रकल्प संचालक बी. एन. पाटील, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.