‘हर घर तिरंगा’ अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

7

मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यवीरांच्या अमूल्य त्यागाचे स्मरण करण्यासाठी आणि देशाचा स्वाभिमान वाढवण्यासाठी यंदाही दिनांक ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान मोठ्या उत्साहात राबवले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या राष्ट्रोत्सवात सर्व नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवून उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे मनःपूर्वक आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे की, तिरंगा हा आपल्या राष्ट्राचा गौरव, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यवीरांच्या अमूल्य त्यागाचे प्रतीक आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागवणारा हा आपल्या अस्मितेचा मानबिंदू आहे. या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन करण्याची आणि ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताची प्रेरणा प्रत्येकाच्या मनामनात जागवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

९ ते १७ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर अभिमानाने तिरंगा फडकवा. राष्ट्रध्वजासोबतचा आपला सुंदर सेल्फी ‘Har Ghar Tiranga’ या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करा. राष्ट्रध्वज फडकवताना तो योग्य स्थितीत असेल आणि त्याचा पूर्ण सन्मान राखला जाईल, याची काळजी घ्या, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

हा केवळ एक शासकीय उपक्रम नसून हा प्रत्येक नागरिकाचा राष्ट्रोत्सव आहे. देशप्रेमाची ही ऊर्जा अखंड ठेवण्यासाठी आपल्या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांना यात सामील करून घ्यावे, असे आवाहनही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.