तंत्रशिक्षण संचालनालयाच्या डिजिटल परिवर्तन ‘ई-गव्हर्नन्स’ पुस्तिकेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

9

मुंबई : राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विविध डिजिटल उपक्रमांची माहिती देणाऱ्या डिजिटल परिवर्तन ‘ई-गव्हर्नन्स’ पुस्तिकेचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय निवासस्थान ‘सिंहगड’ येथे करण्यात आले.

यावेळी तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सहसंचालक डॉ. सुनील भामरे तसेच विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशिक्षण संचालनालयाने गेल्या तीन वर्षांत व्यापक डिजिटल परिवर्तनाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. पारंपरिक कागदाधारित प्रशासनातून पूर्णपणे डिजिटल प्रशासनाकडे वाटचाल करत संचालनालयाने अनेक अभिनव ई-गव्हर्नन्स प्रणाली विकसित केल्या असून राज्यातील शासकीय, अनुदानित आणि खासगी तंत्रशिक्षण संस्थांच्या प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.संचालनालयाच्या विविध डिजिटल प्रणालींचा लाभ राज्यातील ६ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी, सुमारे २,२०० संस्था आणि लाखो विद्यार्थ्यांना होत आहे.

● HR-MIS (Human Resource Management Information System या प्रणालीमुळे राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदी, पदोन्नती, बदली, रिक्त पदे आणि निवृत्तीविषयक माहिती एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध झाली आहे. शिक्षकांच्या बदली व Career Advancement Scheme (CAS) प्रक्रियेलाही ऑनलाइन स्वरूप देण्यात आले आहे. तसेच २०२४-२५ पासून खासगी व्यावसायिक संस्थांच्या अंतिम मान्यता प्रक्रियेचे संपूर्ण ऑनलाइन रूपांतर करण्यात आले असून प्रस्ताव पडताळणी, शुल्क भरणा, दस्तऐवज परीक्षण आणि मान्यता आदेश डिजिटल माध्यमातून दिले जात आहेत.

● Web-Based Budget Management System मुळे अर्थसंकल्पीय प्रस्तावांचे ऑनलाइन सादरीकरण आणि परीक्षण सुरू झाले असून HR-MIS शी एकत्रीकरणामुळे वेतन खर्चाचे अचूक अंदाज तयार करणे शक्य झाले आहे.

● Internal Revenue Generation Management System मुळे परीक्षण व सल्लागार प्रकल्पांचे व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार आणि महसूल वाटप प्रक्रियेत पारदर्शकता वाढली आहे.

●Infrastructure Inventory Management System च्या माध्यमातून राज्यातील शासकीय तंत्रनिकेतने, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि विभागीय कार्यालयांमधील मालमत्तेची डिजिटल नोंदणी आणि GIS आधारित नकाशीकरण करण्यात आले आहे.

● AEDP Monitoring System द्वारे उद्योग-संलग्न पदवी व पदविका अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीचे राज्यस्तरीय रिअल-टाइम निरीक्षण केले जात आहे.
दरम्यान, तंत्रशिक्षण संचालनालयाने पदवी आणि पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चॅटबॉट सुविधा विकसित केली आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील नियम, पात्रता, अर्ज प्रक्रिया, कागदपत्र पडताळणी, प्रवेश फेऱ्या, शुल्क आणि संस्थांविषयीची माहिती २४x७ उपलब्ध होत आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत माहिती उपलब्ध होत असल्याने डिजिटल समावेशकतेलाही चालना मिळाली आहे.

संचालनालयाच्या या डिजिटल परिवर्तनाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २०२५ मध्ये “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम” अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर “१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रम” अंतर्गतही तंत्रशिक्षण संचालनालयाला सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे तंत्रशिक्षण संचालनालय हे राज्यातील एकमेव कार्यालय ठरले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.