डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची विभागीय केंद्रे व उपकेंद्रे तातडीने सुरू करावीत – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

5

मुंबई : विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा अधिक सुलभतेने आणि वेळेत उपलब्ध होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांची विभागीय केंद्रे आणि विविध विद्यापीठांमधील उपकेंद्रे तातडीने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत विद्यापीठाची विभागीय केंद्रे व उपकेंद्रे सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे चार विभागीय केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे उपकेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

मंत्री पाटील म्हणाले, या केंद्रांच्या उभारणीसाठी सर्व संबंधित विद्यापीठांच्या कुलगुरू आणि कुलसचिवांनी आवश्यक जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. विभागीय केंद्रे व उपकेंद्रांच्या माध्यमातून तंत्रशिक्षणाचा विस्तार होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा अधिक सुलभतेने आणि वेळेत उपलब्ध होतील.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव अमोल मुत्याल, उपसचिव प्रताप लुबाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनोद मोहितकर, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.