शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी साकारला भव्य ‘विठोबाचा टिळा’; एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलचा अनोखा आषाढी एकादशी उपक्रम
पिंपरी: “हातात तुळस आणि कृतीत स्वच्छता” या सामाजिक जाणिवेतून मोरवाडी येथील एसएनबीपी (SNBP) इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सण अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला. नेहमीच्या भक्तीमय वातावरणाला यंदा सामाजिक जबाबदारीची जोड देत, शाळेतील विद्यार्थ्यांनी “भक्ती + स्वच्छता = स्वच्छ वारी” असा अत्यंत मोलाचा संदेश संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांना दिला. संपूर्ण शाळेचा परिसर “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि “ज्ञानबा तुकाराम” च्या जयघोषाने दुमदुमून निघाला होता.
‘विठोबाच्या टिळ्याची’ भव्य मानवी रचना आणि कलागुणांना वाव
इयत्ता ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत मैदानावर ‘विठोबाच्या टिळ्याची’ (Tilak of Vithoba) अत्यंत सुंदर आणि आकर्षक प्रतीकात्मक मानवी रचना तयार केली आणि “रखुमाई रखुमाई …” या लोकप्रिय भक्तीगीतावर मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले. तसेच, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना वारकरी परंपरेतील साहित्याची ओळख व्हावी म्हणून शाळेत अगदी बालगटापासून ते इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अभंग गायन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती.


चिमुकल्यांची आनंददायी दिंडी आणि विठ्ठल-रखुमाईचे रूप
आषाढी एकादशीच्या मंगलमय प्रसंगी संपूर्ण शाळा भक्तीभाव, संगीत आणि आनंदाच्या वातावरणाने न्हाऊन निघाली होती. किड्स झोन आणि इयत्ता १ ली ते ५ वी च्या लहान विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात एक देखणी दिंडी काढण्यात आली. यामध्ये विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशातील चिमुकले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कपाळाला टिळा, डोक्यावर टोपी आणि हाती टाळ-पताका घेऊन नटून-थटून आलेले छोटे वारकरी विठुरायाच्या नामात पूर्णपणे रंगून गेले होते.


शालेय दिंडीतून ‘स्वच्छ वारी’चा सामाजिक संदेश
या सोहळ्याचे आणखी एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता ५ वी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात काढलेली विशेष प्रबोधन दिंडी. या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण आणि स्वच्छतेविषयी महत्त्वाचे संदेश दिले. “वारी म्हणजे भक्तीची गंगा; तिचा प्रवाह स्वच्छ राहू दे”, “स्वच्छ मार्ग हेच विठ्ठलाला अर्पण केलेले सर्वात मोठे अर्घ्य आहे” आणि “वारी हा श्रद्धेचा प्रवाह आहे, तो आपण प्रदूषित करू नये” अशा आशयाचे फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी समाजाने ‘स्वच्छता’ हाच आपला सर्वात मोठा संकल्प म्हणून पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

या आनंदमय सोहळ्यात विद्यार्थ्यांसोबत एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. प्रियांका अग्रहरी मॅडम, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील प्रत्यक्ष दिंडीत सहभागी होत वारीचा मनमुराद आनंद घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रेम, उत्साह आणि एकजुटीने आपल्या या समृद्ध भारतीय परंपरेचा अनुभव घेतला.