मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्या महाराष्ट्र सरकारला ह्या ‘सात’ महत्त्वाच्या सूचना

14

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी मंत्रालयात निमंत्रित बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी महाराष्ट्र सरकारला केलेल्या महत्त्वाच्या सूचना.

● गेला दीड महिना पोलीस अहोरात्रं काम करत असल्यामुळे त्यांना थकवा जाणवतो आहे त्यामुळे ‘राज्य राखीव पोलीस दल’ बोलवण्यात यावं त्यामुळे पोलीस यंत्रणेला थोडीशी का होईना उसंत मिळेल आणि समाजकंटकांवर दरारा राहील.

● स्पर्धा परिक्षांसाठी पुण्यात आलेल्या राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांची त्यांच्या मूळगावी परतण्यासाठी सरकारने व्यवस्था करावी.

● जे परप्रांतीय आपापल्या राज्यात परतले आहेत ते जेव्हा पुन्हा येतील किंवा आणले जातील तेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी व आंतरराज्यीय स्थलांतर कायद्यान्वये मजुरांची नोंदणी केल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नये. जेणेकरून आतापर्यंत जी अनागोंदी माजली होती ते पुन्हा होणार नाही.

● परप्रांतीय परतल्यामुळे काही उद्योग-धंदे ठप्प होणार असतील तर अशा ठिकाणी महाराष्ट्रातील तरुणांना-तरुणींना प्राधान्य द्यावे, सरकारने त्या रोजगारांची माहिती राज्यात सर्वदूर पोहचवावी.

● शैक्षणिक वर्ष आता काही दिवसात सुरु होणार आहे तेव्हा शाळा कशा सुरु होणार? ह्यांची स्पष्टता सरकारतर्फे येणं आवश्यक आहे जेणेकरून पालकांची चिंता कमी होईल.

● शासकीय कर्मचारी, महापालिका कर्मचारी, सफाई कामगार ह्यांना सुरक्षा साधनं अपुरी पडत आहेत, त्यांना मुबलक सुरक्षा साहित्य पुरविण्यात यावं.

● कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सध्या आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचं सरकार कसं निराकरण करणार आहे ? अगदी आयत्यावेळी सांगून जनतेला गोंधळात टाकण्यापेक्षा योजनाबद्ध पद्धतीने टाळेबंदी शिथिल करावी कारण लस मिळेपर्यंत टाळेबंदी हा काही उपाय नाही.