राज ठाकरे यांनी कारवाईची मागणी केलेल्या माहीम येथील अनधिकृत बांधकावर प्रशासनाकडून त्वरित कारवाई … बांधकाम हटवण्यात आले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बुधवारी गुढीपाडवा मेळावा पार पडला. राज ठाकरे यावेळी कोणाला टार्गेट करणार याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर सरकारचे लक्ष केंद्रित केले. यातील महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे माहीम भागातील अनधिकृत बांधकाम. राज ठाकरे यांनी माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचं म्हणत एक व्हिडीओ दाखवला होता. तसेच हे बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी गणपती मंदिर बांधू, असा इशाराही त्यांनी दिला. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आज कारवाई करण्यात आली असून महापालिकेकडून हे बांधकाम पडण्यास सुरुवात झाली आहे.
बुधवारी रात्री निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. या कारवाईसाठी सहा अधिकाऱ्यांचे एक पथक नियुक्त करण्यात आले . आज सकाळपासून हे अतिक्रमण हटवण्याच्या कमला सुरुवात झाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घेतली आहे. कारवाईत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही.
राज ठाकरे याची मेळाव्यात ड्रोन द्वारे दाखवलेली जागा ६०० वर्षे जुनी आहे. ती जागा ऐतिहासिक आहे. आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा चिल्ला आहे, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिले जात होते. असे माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले होते कि, माहीम येथील समुद्रात उभे राहत असलेल्या दर्ग्यावर महिनाभरात कारवाई झाली नाही तर भव्य गणपती मंदिर उभारू असा इशाराही त्यांनी दिला होता. १२ तासाच्या आत येथे कारवाई देखील करण्यात आली आहे.