महाराष्ट्राची चिंता वाढली! मुंबई विमानतळावर आलेल्या 861 प्रवाशांपैकी 3 कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई: ओमिक्रॉन व्हेरिएंट जगातील विविध देशांमध्ये धडक दिली असून, भारतातही प्रवेश केला आहे. कर्नाटकात दोन कोरोना रुग्णांना ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे केंद्रासह सर्वच राज्यातील सरकारं सतर्क झाली आहेत. महाराष्ट्रातही खबरदारी घेतली जात असून, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘राज्यात अद्याप कोविड-19 विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने बाधित झालेला एकही रुग्ण नाही. मात्र, याबाबत राज्य शासन सतर्क असून या व्हेरियंटच्या चाचण्या करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रयोगशाळा विकसित केल्या जात आहेत.’
केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतरच ओमिक्रॉन व्हेरियंट प्रादुर्भाव आढळलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच हाय रिस्क देशांबाबत काय निर्बंध लावायचे याबाबत निर्णय घेतला जाईल.
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 2, 2021
कोविड विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत राज्यातील मुंबई विमानतळावर येणाऱ्या 861 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 3 प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या 28 नागरिकांचे अहवाल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहेत,’ अशी माहिती टोपे यांनी दिली.
‘मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालय, प्रयोगशाळा तसेच पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे याबाबतचे काम सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या महाविद्यालयात जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा आहेत. काही शासकीय दवाखान्यात अशा प्रकारच्या प्रयोगशाळा विकसित करण्याबाबत विचार सुरू आहे’, असंही आरोग्यमंत्री म्हणाले.