पुण्यात लहान मुलासह आलेल्या दोन महिलांनी लंपास केले 1.2 कोटींचे सोन्याचे दागिने

4

पुणे: पुण्यामध्ये मुंबईहुन दागिने विक्रिसाठी आलेल्या व्यावसायिकाकडील तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे दागिने लंपासा करण्यात आले आहे.  सुमारे 3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने लहान मुलासह आलेल्या दोन महिलांनी लंपास केल्याचा आरोप आहे. हा प्रकार पुण्यातील रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानात घडला.

ही घटना शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेतील राजमल माणिकचंद आणि कं. ज्वेलर्स सराफ दुकानात घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिस प्रकरणाचा युद्ध पातळीवर तपास करत आहेत. त्यांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्या आधारे महिलांचा शोध घेत आहेत.

जिग्नेश नरेश बोराणा (33, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेची खातरजमा करुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बोराणा आणि मुकेश चौधरी हे मुंबईहून पुण्यात दागिने विक्रीसाठी आले होते. ते रविवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानात गेले. त्यांच्याकडे एक दागिन्यांची पेटी होती. त्यामध्ये सुमारे 1 कोटी 20 लाख रूपये किंमतीचे 3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने होते.

लहान मुलगा आणि दोन महिलांनी ती सोन्याचे दागिने असलेली पेटी पळवली. बोराणा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची भंबेरी उडाली. फिर्याद दाखल करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास फरासखाना पोलिस करीत आहेत.

दुसरीकडे, सोलापूर शहरातील लकी चौकात असलेल्या गणेश रामचंद्र आपटे या सराफ दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिला ग्राहकाच्या पाटल्यांची चोरी झाली होती. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यावेळी तीन महिला चोरांच्या सोबत एक लहान मुलगाही दिसत होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.