मुंबई विमानतळावर विमानाला पुशबॅक करणाऱ्या वाहनाला भीषण आग

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मोठी दुर्घटना टळली. विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाला आग लागली. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. एअर इंडियाच्या फ्लाइट एआय-६४७ ला पुशबॅक करणाऱ्या एअरक्राफ्ट टगमध्ये आग लागली. अपघात झाला तेव्हा विमानात जामनगरला जाणारे सुमारे ८५ प्रवासी होते.

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अग्निशमन दलाचे पथक आग विझवताना दिसत आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत विमानाचं कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त नाही. मुंबई-जामनगर फ्लाइटमध्ये ८५ प्रवासी होते. त्याचवेळी अचानक पुशबॅक टगने पेट घेतला.

घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरुवात केली. १० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत कोणत्याही व्यक्तीला इजा झालेली नाही. प्रवाशांनी भरलेल्या विमानाला पुशबॅक करणाऱ्या वाहनातून अचानक धूर येऊ लागला आणि काहीवेळातच या वाहनाला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांना तत्काळ पाणी टाकत आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.