आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई: भाजप आमदार आशिष शेलार यांना फोन करुन धमकी देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांमध्येच अटक केली आहे. आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत स्वतः आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून माहिती दिली होती. तसेच कारवाई करण्याची मागणी केली होती. गुन्हे शाखेने धडक कारवाई करत धमकी देणाऱ्याला अटक केले आहे. गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिट ९ च्या अधिकाऱ्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबईतून अटक केली आहे.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांना फोनवर धमकी देणाऱ्या एकाला गुन्हे शाखा वांद्रे युनिट ९ च्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. सदर आरोपी हा माहीम कॉजवे या ठिकाणी राहणार आहे. या आरोपीचे आमदार आशिष शेलारांसोबत वाद असल्याची माहिती समोर येत आहे. पूर्ववैमनस्यातून धमकी देण्यात आली होती. वांद्रे यूनिट ९ च्या अधिकाऱ्यांनी या तरुणाला अटक करुन वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आशिष शेलार यांना मागील काही दिवसांपासून दोन मोबाईल क्रमांकावरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याने शेलारांना पूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबतची तक्रार आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली होती. वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे.