शरद पवारांनी नव्हे काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला – रामदास आठवले
कल्याण: शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपला होता, असं विधान शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलं होतं. त्याला रिपाइं नेते रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसला नाही. तर काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.
रामदास आठवले आज कल्याणमध्ये होते. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बैठकीनिमित्ताने ते कल्याणमध्ये होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. शिवसेना नेते अनंत गिते यांच्या टीकेवरही आठवलेंनी प्रतिक्रिया दिली. 1998मध्ये मी शरद पवार यांच्यासोबत होतो. शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे गीते यांचा आरोप चूकीचा आहे, असे आठवले म्हणाले. शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचं शिवशक्ती भिमशक्ती स्वप्न साकार केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यात सध्या आरोप प्रत्यारोगाचे राजकारण सुरू आहे. संजय राऊत हे चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहेत, त्यावर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उलट सुलट आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. सजंय राऊत हे सत्ताधारी पक्षात आहेत. खासदार, प्रवक्ते आणि शिवसेना नेते आहेत. त्यांनी असे चूकीचे आरोप करून वेळ घालवू नये, असा सल्ला आठवले यांनी राऊत यांना दिला आहे.