फडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि भाजपमध्ये फूट पडली; संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई: महाराष्ट्रात ज्याप्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही. शिवसेनेने आपले डिपॉझिट जप्त होऊ नये याकडे लक्ष द्यावे, असा खोचक टोला महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात बोलताना लगावला होता. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिवसेना भाजपच्या नोटांना पुरून उरेल, असे राऊत म्हणाले. फडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि पक्षात फूट पडली, अशी टीकाही राऊत यांनी केली.

देशातील पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील गोवा राज्यातही विधानसभा निवडणूक होत आहे. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपने फडणवीस यांना निवडणूक प्रभारी म्हणून गोव्यात पाठवले आहे. यातच फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी आव्हान दिले आहे.

गोव्यात आमची खरी लढाई नोटांशीच आहे. भाजपचे लोक गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत. विशेषत: महाराष्ट्रातून बॅगा जात आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल आणि जनतेला दबावाखाली येऊ नका, असे सांगण्याचा प्रयत्न करेल. शिवसेना हा सर्वसामान्यांचा, बहुजनांना, हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना भाजपच्या नोटांना पुरून उरेल हे नक्की आहे. फडणवीसांना माझा शब्द आहे तुम्ही कितीही नोटा टाका आम्ही नोटांशी लढू, असे पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.